पनवेल(प्रतिनिधी) सिडकोमार्फत 10 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच समितीचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गिरीष गुणे, त्यांचे सहकारी तसेच सिडकोचे अधिकारी यांच्या समवेत पार पडली.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोविड हॉस्पिटल कसे असावे याबाबत चर्चा करण्यात आली.साधारणतः 200 बेड्सचे हे हॉस्पिटल असेल. त्यामध्ये 150 बेड्स हे नॉर्मल असतील, तर 50 बेड्स स्पेशल असतील. व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची व्यवस्था तसेच तज्ज्ञ डॉक्टर,
नर्सेस, वार्डबॉय, स्टाफ किती असावा, हे हॉस्पिटल उच्च दर्जाचे असावे, याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचवेळी या विभागात मोठ्या प्रमाणात सिडकोने या सुविधांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. सिडकोने या विभागात केवळ कोविडचा विचार न करता या ठिकाणी कायमस्वरूपी एम्सच्या धर्तीवर उरण, पनवेल परिसरातील गोरगरिबांसाठी सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करावे, अशी संघर्ष समितीतर्फे ठाम भूमिका मांडण्यात आली.
या बैठकीला लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, समितीचे उपाध्यक्ष बबनदादा पाटील, समितीचे सचिव महेंद्र घरत, श्री साई देवस्थानचे विश्वस्त रवींद्र पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गिरीष गुणे आणि त्यांचे सहकारी आणि सिडको अधिकारी उपस्थित होते.